स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के यांचे कार्य प्रेरणादायी – खासदार सुधाकरराव शृंगारे
महावार्ता न्यूज/ सुशिल वाघमारे

महावार्ता न्यूज : निजामाच्या पोलीस ठाण्यातील शस्त्रसाठा लुटून हैद्राबाद मुक्तिसंग्रामासाठी चाकूरच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेला लढा क्रांतिकारक होता. या लढ्यात वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन खासदार सुधाकरराव शृंगारे यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्ताने सत्कार प्रसंगी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वतंत्रता संग्राम के गुमनाम नायक’ उपक्रमांतर्गत हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्ताने जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के (वय ९८ वर्षे) यांचा चाकूर येथील निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, नगराध्यक्ष कपिल माकणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन निळकंठ मिरकले, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैनगिरे, अशोकराव चिंते, नगरसेवक अभिमन्यू धोंडगे, सागरभैया होळदांडगे, सिद्धेश्वर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील म्हणाले, पारतंत्र्याच्या काळातील परिस्थिती भयावह होती. स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःची, कुटुंबाची पर्वा न करता मुक्तिसंग्रामाच्या यज्ञकुंडात वयक्तिक सुख समाधानाची आहुती दिली. त्यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. यावेळी मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करून त्यांच्याशी हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढाई संदर्भात संवाद साधला. याप्रसंगी संभाजी सोनटक्के, राष्ट्रीय खेळाडू शिवकुमार सोनटक्के, माजी सरपंच संगमेश्वर जनगावे, सिद्धेश्वर सोनटक्के, सुमित सोनटक्के, शुभम सोनटक्के, शिवशरण सोनटक्के, विशाल विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अजयकुमार नाकाडे, सावता परिषदेचे आत्माराम डाके आदी उपस्थित होते.