गांधींनी केला तो अपमान खूप झाला, आता पुन्हा हरिजन होऊ नका – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
नांदेड (महावार्ता न्यूज) : महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी आम्हाला स्वातंत्र्यापूर्वी हरिजन म्हणून केला तो अपमान खूप झाला, आता पुन्हा एकदा हरिजन होऊ नका व वारंवार अपमानित होऊ नका असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील गुरु रविदास सभागृहात गुरु रविदास व मान्यवर कांशीरामजी संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड हे होते.
आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यवस्थेने अस्पृश्य ठरविलेल्या लोकांच्या तळाचा शोध घेण्यासाठी “निचे चलो” हे अभियान राबविले, त्यासाठी “शुद्र पूर्वी कोण होते ?” हा ग्रंथ लिहिला तर याच्या विपरित शुद्रांना गुमराह करण्यासाठी म. गांधींनी “उंचा बनो” हे अभियान राबविले. शुद्रांचा हरिशी कांहीही संबंध नसतांना त्यांना हरिजन ही अपमानजनक उपाधी दिली. ज्यावेळी बाबासाहेब हे लंडनच्या गोलमेज परिषदेत अस्पृश्यांची बाजू मांडत होते त्यावेळी गांधींनी शुद्रांना हरिजन संबोधून त्यांचे कांही प्रश्न नसल्याचे व आम्ही त्यांना प्रत्यक्षात देवाची लेकरे समजतोत असे म्हणून हरिजन सेवक संघ काढून ते आता शुद्र नाहित असा देखावा निर्माण केला होता. तरीही इंग्रजांनी बाबासाहेबांची बाजू ऐकून घेऊन जातीय निवाडा मंजूर केला. या विरोधात पुण्यात उपोषण करुन गांधींनी करार करण्यास बाबासाहेबांना भाग पाडले, त्या पुणे करारातून आमचे लोकप्रतिनिधी नाही तर दलाल तयार झाले.
याच गांधींच्या सनातनी विचारांचा पगडा असलेले लोक रविदासिया धर्माच्या नावाने हरिचा सिंबाॅल घेऊन आता चर्मकार समाजाला हरिजन बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. देवाला सोडलेल्या बायांना देवदासी म्हणतात आणि त्यांच्या अनैतिक संततींना हरिजन म्हणतात. असे हरिजन आता आम्हाला पुन्हा एकदा व्हायचे नाही. हरिजन होण्यापेक्षा आम्ही आता जाती तोडून बहुजन होणे अधिक फायद्याचे असेल असेही शेवटी इंजि. देगलूरकर म्हणाले.
नकली महाराजांच्या नादी लागू नका – माधव गायकवाड
पूर्वी आमचे दुसऱ्यांनी शोषण केले. आता आमच्यातीलच कांही लोकं नकली संत आणि महाराज बनून समाजाला पाया पडण्यासाठी आणि दक्षिणा देण्यासाठी मजबूर करीत आहेत. गुरु रविदासांनी कर्मकांडांना विरोध केला होता म्हणून कर्मकांडांचे स्तोम माजवणाऱ्या अशा नकली महाराजांच्या नादी लागू नका असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी यावेळी अध्यक्षीय समारोपाच्या भाषणातून केले.
“माथै तिलक हाथ जपमाला, जग लुटने को स्वांग रचाया” असे म्हणून गुरु रविदासांनी कर्मकांडांना विरोध केला होता. हे लक्षात घेऊन जयंतीत सत्यनारायण घालणे व भजन किर्तन आरत्या यात समाजाला गुंतऊ नये. आपल्या मुलांच्या शिक्षणावर भर द्यावा. सामाजिक कार्यात सहभागी होऊन काम करणाऱ्यांना सहकार्य करावे. शिवाजी दुसऱ्यांच्या घरात जन्मावा अशी अपेक्षा न बाळगता आपल्या मुलांनाही उच्चशिक्षित होऊन समाजात मिसळण्यास सांगावे असेही शेवटी गायकवाड म्हणाले.
याप्रसंगी डाॅ. भगवान गंगासागर, स्वराज्य संघटनेचे राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, वाकोडे पाटील, कृष्णा आष्टीकर पाटील, विठ्ठल वाघमारे, दिगंबर भाडेकर आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन नागोराव गंगासागर यांनी केले. विचार मंचावर शिवानंद जोगदंड, के. के. गंगासागरे, हरिभाऊ खंदारे (पुणे), बालाजी वाघमारे, संभाजी खंदारे, मा. नगरसेविका सौ. गंधारे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी गुरु रविदास नगर येथे “मी सावित्री बोलतेय !” हा एकपात्री प्रयोग सौ. वंदना संभाजी वाघमारे (बिटरगाव) यांनी सादर केला. नंतर तिथून गुरु रविदास व मा. कांशीरामजी यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी बालाजी सुर्यवंशी, दिलीप गंधारे, पांडुरंग देशमाने, अरविंद येलतवार, विशाल घोडेकर आदिंनी परिश्रम घेतले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.