लातूर जिल्हा परिषदेकडून २ हजार गर्भवतींना मिळणार अनोखा ‘बाळंत विडा’
कुपोषण, माता मृत्युदर कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम ड्रायफ्रूटसह विविध घटकांचा किटमध्ये समावेश

लातूर, दि. १०(महावार्ता न्यूज) : जिल्ह्यातील कुपोषण आणि माता मृत्युदर कमी करण्यासाठी जिल्ह्यातील गर्भवती महिलांना ड्रायफ्रूटसह विविध घटकांचा समावेश असलेला ‘बाळंत विडा’ किट देण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील २ हजार गर्भवतींना होणार आहे.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२३-२४ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना मधून ‘वन स्टॉप सोल्युशन सेंटर फॉर वूमन अँड चाईल्ड’ या नाविन्यपूर्ण उपक्रमात जिल्ह्यातील एकूण ८७ अंगणवाडी केंद्रांची निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत २ हजार गर्भवती महिलांसाठी ‘बाळंत विडा’ किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माता मृत्यू दर कमी करणे, गाव कुपोषणमुक्त करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
‘एक हजार दिवस बाळाचे’ या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ‘बाळंत विडा’ किटमध्ये प्रत्येकी एक किलो खारीक, गूळ, फुटाणा डाळ, शेंगदाणे, प्रत्येकी अर्धा किलो गावरान तूप व खोबरे, प्रत्येकी पाव किलो बदाम, डिंक, काजू, आळीव, जवस, तीळ, ओवा, बडीशेप, तसेच काळे मीठ, २ बेडशीट, २ टॉवेल, आईसाठी २ गाऊन आदी सामग्री दिली जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचा महीला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी कळविले आहे..