नगरध्यक्षावर अविश्वास “प्रहार” चा घरचा आहेर! चाकूरच्या पाणीपुरवठ्याचे काय?
माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे काय म्हणाले पहा
चाकूर: (महावार्ता न्यूज नेटवर्क) येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षावर १३ मे मंगळवारी अविश्वास ठरावाचे निवेदन पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.
चाकूर नगर पंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात विठ्ठलराव माकने, गोविंदराव माकने यांच्यासह स्थानिक प्रमुख नेतृत्वाच्या माध्यमातून निवडणूक लढली गेली. प्रमुख नेतृत्व असणाऱ्या माजी सरपंच विठ्ठलराव माकने यांना मात्र पराभव पत्करावा लागला. चाकूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे गोंडस स्वप्न दाखवत प्रहार ने भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. प्रहार चे कपिल माकने यांना नगराध्यक्ष तर भाजपचे अरविंद बिरादार यांना उपनगराध्यक्ष म्हणून संधी प्राप्त झाली. नगरपंचायतीचा करोभार सुरू झाला. सहली, भेटी, गाटी, सत्कार सोहळे, विकासकामापेक्षा अधिक लक्ष पाणीपुरवठ्यावर होते. तत्कालीन मंत्री बच्चू कडू, व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मुळे ७५ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूरही झाली. नगर पंचायतीत खरचं विरोधी पक्ष अस्तित्वात होता का हा संशोधनाचा विषय आहे. सर्व रामभरोशे! तेरी भी चूप मेरी भी चूप अशीच अवस्था होती. पाणीपुरवठा योजना मंजुरी आली. ठरावावर सह्या करण्यासाठी कोण? किती? काय? कसे ? कधी? गुपचूप झाकली मूठ म्हणत काय केले हे सुज्ञ जनता जाणून आहे. याची चर्चा आजही होताना दिसून येते किंबहुना चविष्टपणे चर्चिली जाते. मधल्या काळात एक कर्तव्यदक्ष इंजिनियर अचूकपणे कर्तव्य निभावत होते त्यांचा देखील खूप सारा अडसर वाटू लागला होता. शहरातील कामे , रस्त्यांना पडलेल्या भेगा. पाच वर्ष पूर्ण होण्याआधीच बंद पडलेली सौर लाईट, हायमस्ट लाईट, याकडे कधी विरोधी पक्षाने लक्ष केंद्रीत केले नाही? आवाज उठवला नाही. पाण्याचा प्रश्न रस्त्यावर घेतलेल्या बोअरला परवानगी कोणाची? कचऱ्याचा प्रश्न ? डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्न? असे अनेक अनुत्तरीत प्रश्न चव्हाट्यावर अस्तानाच उपनगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल झाला. वेळीच राजीनामा देत उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार यांनी आपली बाजू सेफ केली. आता तोच प्रसंग ओढवला आहे प्रहार च्या नगराध्यक्ष कपिल माकनेची. मंगळवारी १४ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.यात प्रहार च्या नगरसेवकांचा ही समावेश आहे. चाकूर नगर पंचायतीचे नगराध्यक्ष कपिल माकने यांच्यावर अविश्वास निर्माण झाल्याने पदावरून काढून टाकून कार्यवाही करण्याबाबत मागणीपत्र सादर केले आहे.
नगराध्यक्ष कपिल मागणे हे आम्हाला विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असून हे नियमबाह्य पद्धतीने कामकाज चालवतात. विशेष म्हणजे हे लातूरला राहत असल्याने ते या पदासाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे नगरपंचायतच्या दैनंदिन कामकाजात प्रचंड विस्कळीतपणा येत आहे. ते नियमबाह्य पद्धतीने भ्रष्टाचार युक्त कारभार चालवतात. त्यामुळे आम्हा नगरसेवकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.(एवढे दिवस हे सोबत राहून गप्प का होते? )
नगराध्यक्ष कपिल गोविंदराव मागणे यांच्यावर नगरसेवकांचा अविश्वास निर्माण झाल्याने नगराध्यक्षांना पदावरून काढून टाकण्यासाठी तातडीने कार्यवाही करून चाकूर नगरपंचायतीच्या विशेष सभेचे आयोजन करावे. असे मागणीपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.
या मागणी पत्रावर करीम गुळवे, मिलिंद महालिंगे ,भागवत फुले ,साईप्रसाद हिप्पाळे, अभिमन्यू धोंडगे , सय्यद मुजम्मिल, रेड्डी सूजाता, ज्योती स्वामी, सय्यद शबाना, कसबे शुभांगी, गोलावर गंगुबाई , पाटील गोदावरी, कांबळे वैशाली, सय्यद शाहीन बानू यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांच्याही स्वाक्षऱ्या असल्याने नगराध्यक्षावर अविश्वास “प्रहार” घरचा आहेर तर नव्हे ना अशी जनतेतून चर्चा होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे नगरसेवकांची मनधरणी करायला नगराध्यक्ष कुठे कमी पडले का? अशी चर्चा जनतेत रंगली आहे. वास्तविक पाहता नगराध्यक्षांचा कालावधी वाढवून पाच वर्ष करण्यात आला असताना नेमक्या काय आशा आकांक्षा नगरसेवकांच्या ते पूर्ण करू शकले नाहीत? जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव दाखल करायला लावणारी यंत्रणा कोणाची? यात भूमिका वटवणारे पात्र कोण ? कोणासाठी हा प्रपंच केला जात असावा? यातून काय साध्य केले जाणार आहे? प्रस्ताव खरोखर मंजूर होईल का? यासारखे असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत. हे सर्व गोडबंगाल कोणी रचले आहे.
७५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काय होणार? जनतेच्या तोंडचे पाणी कोण हिरावून घेत आहे?
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील फोटोतील ते अतिरिक्त चेहरे मोहरे कोण? कशासाठी? कोणासाठी? काय चाल आहे? कोणाच्या इशाऱ्यावर ? काय साध्य करणार?
नेमके सत्ताधारी आणि विरोधी कोण?
महाराष्ट्राच्या राजकारणात जी खेळी झाली ती चाकूर नगरपंचायत ची होणार का?
आमदार “गुवाहटीला” गेले त्यातील मोजकेच सक्सेस झाले. लातूरहून “नगरसेवक” कुठे गेले?
यात स्वतः सामील असतानाही माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक मिलिंद महालिंगे यांनी मात्र निशाण वेगळाच साधला आहे..
प्रस्ताव दाखल झाल्यानंतर महावार्ता न्यूज च्या माध्यमातून नगराध्यक्ष कपिल माकणे यांना संपर्क साधला असता त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही.
- नगराध्यक्ष एकाकी पडले का? काकांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणल्याची परतफेड तर नाही ना? असेच जनतेतून चर्चा होताना दिसून येत आहे. चाकूर नगर पंचायतीच्या नगरसेवकांचा हा येणाऱ्या निवडणुकीचा बी प्लॅन तर नाही ना? पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी किती घेतले? मग चाकूर च्या जनतेला भुल भुलय्या करणारे नगरसेवक पाणी पाजनार की स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जनतेच्या तोंडचे पाणी हिरवणार आशी सोशल मीडियासह , हॉटेल, पानटपरी, चौका चौकात हीच चर्चा रंगली आहे.