लातूरच्या युवकाची उत्तुंग भरारी, मुंबई विद्यापीठात मिळविले अव्वल स्थान
यशोगाथा,

लातूर (महावार्ता न्यूज) : लातूर पॅटर्न हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच शिक्षण पंढरीत शिकलेल्या विद्यार्थ्यांने थेट मुंबई विद्यापीठात लातूरचा नावलौकिक केला आहे. नुकताच एमबीए मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या पदवीचा निकाल लागला. यात शैलेश गायकवाड ने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
सिडेनहॅम महाविद्यालय चर्चगेट मुंबई येथे शिकणारा विद्यार्थी शैलेश श्रीकांत गायकवाड यांनी एमबीए मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन पदवी परीक्षेत मुंबई विद्यापीठातून सर्वप्रथम एक लातूर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. वास्तविक पाहता सिडनहम महाविद्यालय हे आशिया खंडातील सर्वात प्राचीन व प्रतिष्ठित असणारे महाविद्यालय आहे. याच महाविद्यालयामध्ये 10 नोव्हेंबर 1918 ते 11 मार्च 2020 या कालावधीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ही बाब अत्यंत प्रेरणादायी ठरते.
एमबीए शिक्षण घेतल्यानंतर विशेषतः कॉर्पोरेट सेक्टर मध्ये चांगल्या संधी प्राप्त होतात. शैलेश चे नुकतीच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे मुंबई येथील टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापन विभागांमध्ये निवड ही झाली आहे. ही कंपनी रतन टाटा यांनी निर्माण केलेली आहे देशभरातील 54 हजार सल्लागारांना रोजगाराची संदीप देणाऱ्या या कंपनीचे नेटवर्क व्यापक व मजबूत आहे. अशा या कंपनीमधे शैलेश श्रीकांत गायकवाड यांची उत्तम गुणवत्तेच्या आधारे निवड झाली आहे. विशेष बाब मुंबई विद्यापीठात एमबीए पदवी च्या अभ्यासक्रमात शैलेश ने प्रथम स्थानी मजल मारली आहे याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बालपणापासून सुसंस्कृत वातावरणात वाढलेल्या शैलेश चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लातूर येथे झाले. बी टेक केमिकल इंजीनियरिंगचे अण्णा विद्यापीठ चेन्नई येथे झाले. त्यानंतर एमबीए पदवीचे शिक्षण सिडनहॅम कॉलेज मुंबई येथे झाले यात यशाचे सर्वोच्च शिखराला गवसणी घालत शैलेश ने मुंबई विद्यापीठ प्रथम आला. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे शैलेश चे वडील प्राचार्य डॉ श्रीकांत गायकवाड हे उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जातात. लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास आहे.
शैलेश चा मोठा भाऊ निलेश आयपीएस अधिकार आहे. तो सध्या पश्चिम बंगाल राज्यातील रायगंज येथे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते 2021 च्या बॅचचे आय.पी.एस. अधिकारी आहेत. प्राचार्य डॉ श्रीकांत गायकवाड हे सेवानिवृत झाले असले तरी सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असतात. त्यांच्या प्रेरणेतूनच दोन्ही मुलांनी आपलेे उचित ध्येय साध्य केली आहेत.
प्राचार्य डॉ श्रीकांत गायकवाड यांनी महावार्ताशी प्रतिक्रिया देताना म्हणाले की माझ्या दोन्ही मुलांना मी कधीच फोर्स केला नाही. ते बालपणापासूनच प्रचंड मेहनती व अभ्यासू आहेत. त्यांनी स्वयंप्रेरित होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानत शिक्षण घेतले आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मला सार्थ अभिमान आहे. निश्चितच त्यांचे हे यश इतरांसाठी आदर्शवत ठरावे.