साहेबराव ढगे यांना म. फुले प्रशासकीय सेवा पुरस्कार गुरु रविदास साहित्य संमेलनात प्रदान

नांदेड (महावार्ता न्यूज) : नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेतील कर निरिक्षक अधिकारी साहेबराव ढगे यांना महात्मा जोतीराव फुले प्रशासकीय सेवा पुरस्कार सातव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते रविवारी सायंकाळी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने येथील देवकृपा सभागृहात सातवे एक दिवशीय अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना महामानवांच्या नावांनी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
साहेबराव ढगे हे नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या तरोडा झोनमध्ये कर निरिक्षक प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर्वात मिळून मिसळून राहणारे व सामाजिक बांधिलकी जोपासणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. प्रामाणिकपणे आपली सेवा बजावित असतांना त्यांनी फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या विविध सामाजिक कार्यातही सक्रीय सहभाग घेतला आहे.
या सर्व बाबींचा विचार करुन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक तथा गुरु रविदास साहित्य संमेलनाचे मुख्य प्रवर्तक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी साहेबराव ढगे यांची म. फुले प्रशासकीय सेवा पुरस्कारासाठी निवड करुन त्यांना पुरस्कार स्विकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते.