चाकूरच्या शिक्षकांनी कळसुबाई शिखरावर फडकविला राष्ट्रध्वज
चाकूर: दि.१७ (महावार्ता न्यूज/सुशिल वाघमारे)

चाकूरच्या शिक्षकांनी सर केले कळसूबाई शिखर
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या सांगता वर्षाच्या निमित्ताने चाकूर तालुक्यातील १० शिक्षकांनी महाराष्ट्राचे माउंट एवरेस्ट समजल्या जाणाऱ्या १६४६ मीटर उंचीवर असलेल्या निसर्गाची मुक्त देणं लाभलेल्या अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखरावर तिरंगा फडकविला आहे. चाकूर तालुक्यातील तरुण गिर्यारोहक व निसर्गप्रेमी शिक्षकांनी कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकविण्याचा पण केला होता. दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी शाळेतील स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करून या खडतर मोहिमेला सुरुवात केली. १६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी साडेनऊ वाजता कळसुबाई शिखर पादाक्रांत करण्यासाठी मार्गक्रमण सुरू केले. पावसाळ्याचे दिवस असल्याने खळखळनारे झरे, झऱ्याचे संगीत, हिरवीगार वनराई ,बेधुंद वारा, निसरड्या वाटा, सोबतच रिमझिम पाऊस, क्षणात येणारे दाट धुके, ऊनसावलीचा सतत चालणारा पाठशिवणीचा खेळ यांचा सामना करत मजल दरमजल करत अत्यंत खडतर वाटा असताना कधी काठीचा आधार तर कधी एकमेकाच्या मदतीने हातात हात घेऊन प्रवास करून सतत ४ तास चालून शिक्षकांनी १६४६ मीटर उंचीचे असलेल्या कळसुबाई शिखरावर राष्ट्रध्वज फडकवून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगताच या निमित्ताने केली आहे. या मोहिमेत सोबतच प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणही पाहण्याचा योग आला या धरणामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याने शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती झाली आहे. या धरणामुळे वीज निर्मिती करण्यात येत आहे. रंधा फॉल्स हे पण पाहण्यात आले. या मोहिमेत योगीराज केसाळे, संतोष पाटील, नागेश माने, विकास डोंगरे, चंद्रकांत मतलकुटे, महादेव गुजरे, बालाजी तोटे, रवी मद्देवाड, सचिन टिकोरे, रणजीत घुमे यांचा समावेश होता. गड, किल्ले,यासारख्या ऐतिहासिक वास्तु यांना वेळोवेळी भेट देण्याचेही नियोजन आहे. ज्यामुळे यातून आपल्या भारताची राज्याची सांस्कृतिक ओळख वारसा जपला जानार आहे.