सम्यक आयोजित, ‘सक्षम ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र’चा वार्षिक मेळावा
संपादक सुशिल वाघमारे

लातूर- महावार्ता न्यूज प्रतिनिधी ‘सक्षम ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र’चा वार्षिक मेळावा यंदा तांबळडेग, जिल्हा-सिंधुदुर्ग येथे दिनांक १९ ते २१ डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. लातूर, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पत्रकार व पुण्यातील पत्रकारितेचे निवडक विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
स्त्रियांचे विविध प्रश्न, त्यांच्या आरोग्याचे हक्क व स्त्रियांच्या सुरक्षित गर्भपाताच्या अधिकारांबाबत महाराष्ट्रातील स्थानिक वर्तमानपत्रांमधून विस्ताराने लिखाण केले जावे व त्यांतील भाषा ही हक्काधारीत असावी यासाठी ‘सम्यक’ने २०१८ ते २०२० या काळात महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकारांसाठी दोन अभ्यासक्रम चालविले. हे अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र व मुंबई विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाच्या सहकार्याने राबविले गेले. या अभ्यासक्रमांच्या शेवटी ‘सक्षम ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र’ या संघाची स्थापना करण्यात आली. आत्तापर्यंत या अभ्यासक्रमातील पत्रकारांनी स्त्रियांच्या सुरक्षित गर्भपाताच्या व एकूणच अधिकारांच्या मुद्यावर २८० पेक्षा जास्त बातम्या व लेख ग्रामीण महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केले आहेत.
‘सम्यक’ पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या या मेळाव्यात यावर्षी ‘सक्षम ग्रामीण पत्रकार’ संघाच्या सदस्यांसोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे निवडक विद्यार्थीदेखील सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात लिंगभाव, पितृसत्ता, स्त्रियांचे लैंगिक व प्रजनन आरोग्य आणि हक्क, बदलती पत्रकारिता व स्त्रियांचे प्रश्न, डिजिटल माध्यमे आणि फोटोग्राफी या विषयांवरील विविध सत्रांचे आयोजन केल्याचे ‘सम्यक’च्या व्यवस्थापकिय संचालक प्रीतम पोतदार यांनी कळविले आहे.