शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आ. बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुरव्यामुळे हे शक्य झाले.
आष्टा महसूल मंडळाला मिळणार शासनाकडून विविध योजनेचा लाभ

चाकूर – प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील आष्टा महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त मंडळात समावेश करावा अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन व लेखी निवेदन देऊन केली होती. या मागणीला यश आले असून दुष्काळ सदृश्य मंडळात आष्टा या महसूल मंडळाचा नुकताच समावेश करण्यात आला असल्यामुळे या मंडळातील नागरिकांना विविध सुविधा मिळणार असल्याने या मंडळातील नागरिकाकडून आमदार बाबासाहेब पाटील यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले जात आहे.
चाकूर अहमदपूर मतदारसंघात जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीत अतिशय कमी पाऊस झाला होता. सरासरी पर्जन्यमानापेक्षा जवळपास 75 टक्के एवढा कमी पाऊस झाल्यामुळे व पावसाने तब्बल 21 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा खंड दिल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयाची आर्थिक मदत आपत्ती निवारणातून देण्यात यावी अशी मागणी राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार,मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विकास मंत्री अनिल पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केली होती. त्याचबरोबर कमी पावसामुळे या मंडळाची आणेवारी 50 टक्यापेक्षा कमी आले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना पिकांचे उत्पन्न कमी आल्यामुळे 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्याना देण्यात यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर काही महसूल मंडळातील जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीतील पावसाची सरासरी पर्जन्यमान कमी झाल्याने व 750 मीमी पेक्षा कमी पाऊस झाला असल्यामुळे 224 नवीन महसूल मंडळ दुष्काळ सदृश्य म्हणून राज्य शासनाकडून घोषित करण्यात आले असून त्यात चाकूर तालुक्यातील आष्टा महसूल मंडळाचा समावेश आहे.या दुष्काळ सदृश्य म्हणून घोषित झालेल्या मंडळात जमीन महसुलात सूट,सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी, रोहोयो अंतर्गत कामाच्या निष्कर्षात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचा वापर,टंचाईग्रस्त गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे बाबतचे आदेश दिले गेले असल्याने या भागातील जनतेला फार मोठा दिलासा मिळणार आहे. वारंवार या मागणीसाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे आष्टा मंडळाचा भाग दुष्काळ सुदृश्य महसूल मंडळात आला आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी मी कटिबद्ध असून कोणत्याही शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणारा कार्यकर्ता नाही.यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे संपूर्ण मतदार संघात म्हणावे तसे उत्पादन झाले नाही.आष्टा मंडळात तर अतिशय कमी पाऊस झाल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे आष्टा महसूल मंडळ दुष्काळग्रस्त मंडळ म्हणून जाहीर करावे अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स,मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.आपल्या मागणीला यश आले असून आष्टा महसूल मंडळ दुष्काळ सदृश्य मंडळ म्हणून शासनाने जाहीर केल्याने या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्याबद्दल राज्य सरकार व विशेष करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानतो.
बाबासाहेब पाटील
आ.अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघ