महाराष्ट्र

राष्ट्रीय राजकारणात कुर्डूवाडी-माढा ही शहरे प्रभावशून्य:स्थानिक तरुण कार्यकर्त्यांचे भविष्य अंधकारमय

पुणे/कुर्डूवाडी महावार्ता न्यूज (आनंद पवार)दि. १४ मार्च, २०२४ विद्यमान खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांची २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी माढा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपाने घोषणा केली आहे. यानिमित्ताने माढा लोकसभा मतदार संघामध्ये उलट-सुलट राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. विद्यमान खासदारांची माढा-कुर्डूवाडी विभागातील अनुपस्थिती, या पूर्वी माढा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या नेत्यांचे प्रभावहीन काम, माढा-कुर्डूवाडी शहरांच्या विकासाचा अनुशेष आणि रेल्वे कारखान्याविषयीचे प्रलंबित प्रश्न या चर्चांना आता परिसरात उधाण आले आहे.

मुळात राष्ट्रीय राजकारणात कुर्डूवाडी आणि माढा शहरांचे स्थान आत्तापर्यंत नगण्य राहिले आहे. सन १९६२ पासून ते २००९ पर्यंत ही दोन्ही शहरे पंढरपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होती. सन २००८ मध्ये देशभरातील लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचना करण्यात आल्या. पंढरपूर लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना करून नवीन माढा लोकसभा मतदार संघाची निर्मिती करण्यात आली, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार व सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघ जोडले गेले. कुर्डूवाडी-माढ्यातील मतदारांनी आजवर सतरा लोकसभांसाठी मतदान केले, मात्र आत्तापर्यंत या दोन्ही शहरांनी निवडणुकांमध्ये इतर भागातून लादलेले उमेदवारच स्वीकारले आहेत. राष्ट्रीय राजकारणावर छाप पाडू शकेल किंवा ज्यांची दखल घेतली जाईल असे एकही प्रभावी स्थानिक नेतृत्व या दोन्ही शहरांमधून आत्तापर्यंत तयार होऊ शकले नाही. लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत नवीन मतदार संघाला माढ्याचे नाव देऊन येथील जनतेची केवळ बोळवण करण्यात आली, मात्र कुर्डूवाडी-माढयाचे राष्ट्रीय राजकारणात वजन वाढेल असे प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी केले नाहीत हे येथील वास्तव आहे. इतरांचे राजकीय मांडलिकत्व स्वीकारलेले प्रभावहीन स्थानिक नेतृत्व याला कारणीभूत आहेच, शिवाय राष्ट्रीय राजकारणात उतरण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय प्रेरणा निर्माण करण्यातही येथील नेतृत्वाला व जनतेला आत्तापर्यंत अपयश आले आहे. कुर्डूवाडी-माढा शहरातून नव्याने राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये म्हणूनच राष्ट्रीय राजकारणात उतरण्याच्या महत्त्वाकांक्षेचा अभाव आढळून येतो. केंद्रातील व राज्यातील पक्ष-नेतृत्वाची हुजरेगिरी, राष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा अभाव, स्वतंत्र राजकीय महत्त्वाकांक्षेचा अभाव, राष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहोचवू शकतील अशा स्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि केवळ स्थानिक राजकारण करण्याची तोकडी मनोवृत्ती यामुळे कुर्डुवाडी-माढ्यातील सर्वपक्षीय तरुण राजकीय कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात येण्याचे भवितव्य सध्यातरी अंधकारमय असल्याचे दिसते आहे. थोडक्यात, केंद्रीय राजकारणात प्रभाव पाडू शकेल अशा स्थानिक नेतृत्वाची कुर्डूवाडी-माढा शहरातील जागा आजही रिक्तच आहे.

(आनंद पवार, रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नालिजम, पुणे करिता)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button