लातूरच्या प्राध्यापकाला हिंगोलीत सन्मानाच्या पदावर नियुक्ती, अभिनंदनाचा होतोय वर्षाव.
संपादक सुशिल वाघमारे

चाकूर : दि.22 (महावार्ता न्यूज)
हिंगोली येथील स्वायत्त मॉडेल महाविद्यालयाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. नारायण कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
सदरील निवड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केली असून या निवडीबद्दल डॉ. कांबळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
डॉ. कांबळे हे शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात कार्यरत असून यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्षपद भूषविले असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. सध्या ते विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य असून ते संशोधन मार्गदर्शकही आहेत. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 18 विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. त्याचबरोबर त्यांचे तीसच्यावर पुस्तके प्रकाशित झाले आहेत व ते विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लागू आहेत. डॉ. कांबळे हे फुले,शाहू,आंबेडकर विचारांचे गाढे अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते म्हणून परिचित आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल बाळभगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजीमंत्री बाळासाहेब जाधव, सचिव आ. बाबासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. डी.जी. माने, उपप्राचार्य व्यंकटराव कीर्तने, माजी अधिष्ठाता डॉ. विकास सुकाळे, अधिसभा सदस्य तथा नळेगाव येथील शिवजागृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, डॉ. एस. पी. घायाळ यांनी अभिनंदन केले आहे.