आरोग्य व शिक्षणमनोरंजनसामाजिक

पावसाने नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी घेतली भेट.

महावार्ता न्यूज नेटवर्क (संपादक सुशिल वाघमारे)


 जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिकांचे, घरांचे नुसकान झाले असून जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे, मदत वाटप आदी बाबींचा आढावा घेतला. तसेच नागरिकांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.

लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जळकोट येथील जनतेची विचारपूस करताना

उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जळकोट तालुक्यातील काही भागात पुराचे पाणी घरात घुसून, तसेच घरांच्या पडझडीने नुकसान झाले आहे. तसेच या परिसरातील जनावरांचा मृत्यू, जमीन खरडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी रावणकोळा, मरसांगवी, आतनुर आणि शिवाजीनगर तांडा येथे भेट देवून नागरिकांशी संवाद साधला.

घरात पाणी घुसल्याने नुकसान झालेल्या रावणकोळा येथील सागरबाई रावसाहेब पोले, पारुबाई भाऊराव पोले आणि राधाबाई बळीराम डोंगरगावे यांच्या घरी भेटी दिल्या. मरसांगावी येथील मौला हुसेन जमादार, तसेच आतनूर येथील प्रल्हाद नारायण सोमवसे यांच्या शेतात झालेल्या नुकसानी बाबत शेतकरी यांच्याशी संवाद साधला. तसेच जनावरांचा मृत्यू, जमीन खरडून जाणे आदी नुकसानीचीही जिल्हाधिकारी यांनी यावेळी माहिती घेतली, तसेच या नुकसानीच्या पंचनाम्याचा आढावा घेतला.

नुकसानग्रस्तांना शासन नियमाप्रमाणे तातडीने द्यावयाच्या मदतीचे विनाविलंब वितरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ज्याठिकाणी पुल वाहून गेले आहेत, त्याठिकाणी संबंधित यंत्रणेला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जे तलाव भरलेले आहेत त्याठिकाणी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व नागरिकांना शासनाची मदत भेटेल, मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button