लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात- जिल्हाधिकारी
संपादक सुशिल वाघमारे

लातूर महावार्ता न्यूज: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात- जिल्हाधिकारी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार असून यासाठी विविध पथके गठीत करण्यात आली आहेत. मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि अचूक होण्यासाठी या पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या दयानंद सभागृह येथे आयोजित प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. प्रभारी अपर जिल्हाधिकारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, प्रियांका आयरे, संगीता टकले, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, शरद झाडके, मंजुषा लटपटे, सुशांत शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह सर्व तहसीलदार, मतमोजणीसाठी नियुक्त पर्यवेक्षक, मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मतमोजणी प्रक्रिया अचूकपणे आणि विहित कालावधीत होण्यासाठी सर्वांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मतमोजणी विषयक निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र कक्षात मतमोजणी होणार असून टपाल मतपत्रिका मोजण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतमोजणी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह या माहितीची नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही अतिशय काळजीपूर्वक माहिती नोंदवावी. प्रत्येकाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे म्हणाल्या.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी यावेळी मतमोजणी कक्षाबाबत माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी मायक्रो ऑब्झर्व्हर यांची कर्तव्ये, मतमोजणी आकडेवारीच्या तक्त्याबाबत मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी सैनिकांच्या मतपत्रिका मोजणीची कार्यपद्धती सांगितली. उपजिल्हाधिकारी संगीता टकले आणि प्रियांका आयरे यांनी टपाली मतपत्रिका मोजणीबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रदीप डूमणे यांनी एनकोर प्रणालीबाबत माहिती दिली. उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी मतदान यंत्राद्वारे मतमोजणी याबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे आणि अरुणा संगेवार यांनी सिलिंग प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन केले.