मुलींनो अन्याय होत असेल तर जिजाऊ सावित्री होऊन प्रतिकार करा – सुमती बिडवे
स्वामी विवेकानंद प्राथमिक माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

चाकूर महावार्तान्यूज प्रतिनिधी : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतनिमित्त शुक्रवारी दि.१२ जानेवारी २०२४ सकाळी १० वाजता सुमती बिडवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
मुलगी आहे म्हणून मागे राहू नका,अन्याय होत असेल तर प्रसंगी जिजाऊ होऊन प्रतिकार करा, तरच उद्या तुमच्यातूनच जिजाऊ सावित्री घडतील असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्यात्या सुमती बिडवे सोमवंशी यांनी स्वामी विवेकानंद विद्यालय चापोली येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामगिर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम मद्रेवार,लक्ष्मण मद्रेवार,मुख्याध्यापक व संचालक व्यंकटेश बाबुराव शिंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख वक्त्या यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय करुन देण्यात आला.यानंतर किरण जगन्नाथ शेवाळे या विद्यार्थिनीने जिजाऊ वरती कविता सादर केली.
पुढे बोलताना सुमती बिडवे म्हणाल्या की यशासाठी प्रयत्नाची गरज असते हे राजमाता जिजाऊंच्या चरित्रावरून स्पष्ट होते .जिजाऊंचे कार्य हे केवळ चूल आणि मूल या परिघापूरते नव्हते तर स्वराज्य हेच त्यांचे घर होते .स्वराज्यातील सर्व जाती धर्माच्या मुलांना त्यांनी आपल्या शिवबा प्रमाणे वागवले. त्यांनी कधीही भेदाभेद केला नाही व अंतर दिले नाही. जिजाऊ समतावादी होत्या त्यामुळे सर्व जाती धर्माचे मुले शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी प्राण अर्पण करण्यासाठी पुढे आली.
जिजाऊंच्या चरित्रातून समता आणि बुद्धीप्रमानवाद शिकला पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती मुसने यांनी केले तर आभार विठ्ठल गवळे यांनी मानले.कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.