मराठवाडा मुक्ती संग्रामात चाकूरच्या सुपुञांचे योगदान? जाणून घ्या सविस्तर
महावार्ता न्यूज: सुशिल वाघमारे -

मराठवाडा मुक्ती संग्रामात चाकूरच्या सुपुञांचे योगदान
चाकूर : निजाम सरकारच्या पोलीस ठाण्यातील तुकाराम नावाच्या शिपायाला आपलंसं करून सहकारी स्वातंत्र्य सैनिकांच्या मदतीने ठाण्यातील बंदुका, दारुगोळा व इतर शस्त्रसाठा लुटला. निजामाचे खबरे, सैनिक व हस्तक अशा जवळपास २५ व्यक्तींना वयाच्या २२ व्या वर्षी बळीराम सोनटक्के यांनी यमसदनी पाठवले. अशा अनेक सशस्त्र क्रांतिकारी लढ्यातील आठवणी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने वयाच्या ९८ व्या वर्षी स्वातंत्र सैनिक बळीराम बापूराव सोनटक्के यांनी जागवल्या आहेत.
आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र झाला असला तरी भारतातील तीन संस्थाने स्वतंत्र झाली नव्हती. त्या तीन संस्थानातील एक हैद्राबाद हे निजामाचे संस्थान होते. ते भारतात सामील होण्यास तयार नव्हते. निजाम राजवटीविरुद्ध मराठवाड्यातील अनेक शुरवीरांनी लढा पुकारून आंदोलन उभे केले अन् मराठवाडा निजामाच्या तावडीतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मुक्त केला. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल १ वर्ष १ महिना २ दिवसांनी मराठवाडा स्वतंत्र झाला. यामध्ये मराठवाड्यातील लातूर जिल्हातील चाकूर तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा सशस्त्र लढ्यात सक्रिय सहभाग होता. या लढ्याचा अमृत महोत्सव वर्षभर विविध कार्यक्रमांनी शासन स्तरावरून यावर्षी साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.
निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध व रजाकाराच्या आत्याचारविरुद्ध चाकूर तालुक्यातून अनेक तरुणांनी सशस्त्र लढा उभारला. या लढ्यात चाकूर येथील वयाच्या २२ व्या वर्षी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले बळीराम बापूराव सोनटक्के आजही हयात आहेत. चाकूर, वडवळ नागनाथ, नळेगाव, जढाळा, रोहिणा, जानवळ, शिवणखेड बु. आदी गावातील अनेक तरुणांचा या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. खऱ्या अर्थाने हे स्वातंत्र्यविरच देशाचे प्रथम नागरिक आहेत.
त्याग, बलीदान, समर्पणाची ओळख नवीन पिढीला व्हावी म्हणून या थोर व्यक्तमत्वांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान शासन स्तरावरून गेला जात आहे. चाकूर शहरातील गणेशराव कुलकर्णी, भिमसेनजी आर्य यांनी नागनाथ शेटे यांच्या घरी आर्य समाजाची शाखा चालू करून हिंदू संघटना उभी केली. तसेच गिरीधारीलाल नावंदर यांनी तालीम काढून पैलवानांची फौज तयार केली. नरसिंग भांगे यांनी शस्ञे, बंदूका, बॉम्ब गोळे तयार करून पुरवठा केला. निजाम सरकारचे रजाकार सैन्य व पोलीसांकडून गावातील हिंदु नागरीकांस त्रास होत असल्याने आधीच हिंदु चिडून होते. पोलादी पुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचे समर्थक व लातूररोड येथे रेल्वेने बिदरहून आलेले रजाकार सैन्य यांच्यात संघर्ष झाला. चाकूरातील स्वातंत्र्य सैनिकांनी पोलीस ठाण्यातील बंदुकांचा साठा राञीतून पळवला अन् दुसऱ्या दिवशी सशस्त्र लढा पुकारला. यामध्ये मारुती बावलगावे, बळीराम बापूराव सोनटक्के, निवृत्ती रेड्डी यांनी जय भवानी गल्लीमधे एक तासात पंचवीस रजाकार सैन्यास यमसदनी पाठवले. ही धूसपूस अनेक दिवस चालली होती. त्यात बाकी काही स्वातंत्र्य सैनिक भूमीगत रहिले परंतु बळीराम बापूराव सोनटके व निवृत्ती रेड्डी यांना अटक झाली. स्वातंत्र्य सैनिकांचा गावात व परिसरात दबदबा होता त्यामुळे न्यायालयात यांच्या विरोधात साक्ष देण्यास कोणीही तयार झाले नाही. या दोघांना अहमदपूर जेलमधे ठेवण्यात आले पण हे दोघे जेलमधे गोंधळ घालत असल्याने त्यांना बिदर येथे साखळदंडाने बांधून ठेवण्यात आले. त्यांना शिक्षा म्हणून बिदर येथे सहा महिण्यांची जेल झाली.
निजाम सरकारच्या पोलीस ठाण्यातील तुकाराम नावाच्या शिपायाला आपलंसं करून सहकारी स्वातंत्र्य सैनिकांच्या मदतीने ठाण्यातील बंदुका, दारुगोळा व इतर शस्त्रसाठा लुटला. निजामाचे खबरे, सैनिक व हस्तक अशा जवळपास २५ व्यक्तींना वयाच्या २२ व्या वर्षी बळीराम सोनटक्के यांनी यमसदनी पाठवले. बळीराम सोनटक्के स्वतः पैलवान असल्यामुळे त्यांच्याकडे तालमीतील मित्रमंडळी मोठ्या संख्येने होती. याचा उपयोग त्यांनी निजाम राजवटीविरुद्ध आंदोलन उभे करण्यासाठी केला. या कार्याची दखल लक्ष्मण पेंटर लिखित ‘मी पाहिलेला हैद्राबाद मुक्तीसंग्राम’ या ग्रंथात घेण्यात आली आहे. निवृत्ती रेड्डी, गिरीधारीलाल नावंदर, लक्ष्मण पेंटर, नरसिंग भांगे, सिताराम ढोलगे, माणिकराव पाटील, रेवप्पा होळदांडगे, ञ्यंबकराव मोतीपवळे, गणपत कोळी, तानाजी वाघमारे, जिनदास बुरसे, देविदासराव जोशी, गोविंदराव दामोदर साळी, बळीराम होळदांडगे, गोविंदराव क्षीरसागर, देवराव जाधव, नागनाथ तुकाराम शेटे, हरिबा मोरे आदी ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचा या लढयात सहभाग होता.
या सशस्त्र क्रांतिकारी लढ्यातील आठवणी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने वयाच्या ९८ व्या वर्षी स्वातंत्र सैनिक बळीराम सोनटक्के यांनी जागवल्या आहेत.