चाकुर तालुक्यात होणार महसूल सप्ताह साजरा महसूल विभागाच्या कामकाजाचा दिला जाणार आढावा- तहसीलदार रेणुकादास देवनिकर
(सुशिल वाघमारे महावार्ता न्यूज)
चाकूर तालुक्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा होणार महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता शासनातर्फे दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येतो. तसेच यावर्षी महसूल दिनापासून दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या दरम्यान राज्यभरात महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सदर सप्ताहामध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिनांक कार्यक्रमाचे स्वरूप
१ ऑगस्ट महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ
२ ऑगस्ट युवा संवाद
३ ऑगस्ट एक हात मदतीचा
४ ऑगस्ट जनसंवाद
५ ऑगस्ट सैनिक हो तुमच्यासाठी
६ ऑगस्ट महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संवाद
७ ऑगस्ट महसूल सप्ताह सांगता समारंभ
महसूल सप्ताहाचा शुभारंभ १ ऑगस्ट रोजी ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध अधिकाऱ्यांचा/कर्मचाऱ्यांचा सन्मान करून करण्यात येईल. २ ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आणि प्रमाणपत्र यांचे वाटप केले जाईल. ३ ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार बाधित नागरिकांना सोयी सुविधा तसेच नुकसान भरपाई मिळण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. ४ ऑगस्ट रोजी ‘जनसंवाद’ कार्यक्रमांतर्गत महसूल अदालतींचे आयोजन करून विविध स्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे व अपिले निकालात काढण्यात येतील. ५ ऑगस्ट रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमांतर्गत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून संरक्षण दलातील कर्मचारी यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकालात काढण्यात येतील. ६ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रलंबित सेवा विषयक बाबी निकालात काढण्यात येतील. ७ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहामध्ये करण्यात आलेल्या विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमातील प्रतिनिधी व इतर मान्यवर व्यक्ती यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात येईल.या अनुषंगाने सर्व नागरिकांनी या सप्ताहामध्ये सहभाग नोंदवून शासकीय कार्यक्रम, योजना, उपक्रम यांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासन मार्फत तहसीलार रेणुकादास देवणीकर यांनी केले आहे.