आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा, जिल्हा परिषदेला आले पुन्हा सुगीचे दिवस!
तो अध्यादेश रद्द करण्याची मागणी , शिक्षक बांधव बुचकळ्यात!

लातूर महावार्ता(सुशिल वाघमारे):
आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नवीन भरतीपुर्वी कार्यमुक्त करा; भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा ४ जानेवारीचा ‘तो” आदेश रद्द करण्याची मागणी राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा नुकताच ऑनलाईन राबविण्यात आला असून या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या ४ जानेवारीच्या पत्रानुसार आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नवीन भरती नंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरुन कार्यमुक्त करण्याबाबत आदेशीत केले आहे. हे ग्रामविकास विभागाचे आदेश रद्द करून नवीन शिक्षक भरतीपूर्वी सर्व आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना एका ठराविक तारीख ठरवून त्या तारखेपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश त जिल्हा परिषदांना देण्यात यावेत अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या विषयीची माहीती अशी की, ग्रामविकास विभागाच्या ४ जानेवारीच्या आदेशात किती तारखे पर्यंत कार्यमुक्त करावे या बाबत स्पष्टता नाही.त्यामुळे कार्यमुक्तीसाठी जिल्हा परिषद स्तरावर वर पुन्हा भ्रष्टाचार होण्यास रान मोकळे करुन दिल्याचे अनेक आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचे मत आहे. तसेच कार्यमुक्ती नवीन शिक्षक भरती नंतर केली तर भरती साठी निव्वळ रिक्त पदे कळणार नाहीत व भरती पोर्टलला रिक्त पदे दिसणार नाहीत. आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना नवीन भरती पुर्वी कार्यमुक्त केले तर सर्व जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या भरती पोर्टलला दिसेल व भरती प्रक्रिया व्यवस्थितपणे राबविता येईल.त्यामुळे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांबरोबर नवीन भरती होणाऱ्या शिक्षकांना समान न्याय मिळेल.तसेच नवीन भरती पूर्वी अंतिम तारीख देऊन एखाद्या तारेखपर्यंत आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करुन रिक्त पदे तात्काळ कळविण्याचा आदेश राज्यातील जिल्हा परिषदांना दिले तर बदल्यांमधील भ्रष्टाचार कमी होईल.तारीख टाकुन कार्यमुक्ती चे पत्र न निघाल्याने जिल्हा परिषद स्तरावर कार्यमुक्तीसाठी आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता अनेक आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षक व्यक्त करीत आहेत. शासनाने ऑनलाईन बदल्या करुन संपविलेला भ्रष्टाचार कार्यमुक्ती मध्ये होईल व भ्रष्टाचार मुक्त बदल्या या शासनाच्या धोरणाला काळीमा फासला जाऊ शकतो.यामुळे जि.प. स्तरावर आर्थिक गैरव्यवहार होण्यासाठी प्रोत्साहन देणारा, ग्रामविकास विभागानचा ४ जानेवारीचा मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा दिलेला आदेश त्वरित रद्द करुन एक अंतिम तारीख देऊन त्या तारखे पुर्वी सर्वांना नवीन भरती पुर्वी कार्यमुक्त करण्यास आदेशीत करावे असे निवेदन शिक्षक सहकार संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
याबाबत शिक्षक नेते संतोष पिट्टलवाड, राज्याध्यक्ष, शिक्षक सहकार संघटना,महाराष्ट्र राज्य यांनी महा वार्ताशी बोलताना म्हणाले की,
“यापुर्वी शासनाने न्यायालयात गेलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदस्थापना बदलुन देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्हा परिषदेमध्ये अशा शिक्षकांना पदस्थापना बदलुन देत असल्यामुळे आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे जिल्हा परिषद स्तरावर वर शाळा बदलुन देण्याचे आदेश बंद करुन आँनलाईन बदल्या मध्येच कोर्ट प्रकरणातील लोकांना प्राधान्य देण्यात यावे”.