घोटभर पाण्यासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
निष्क्रिय आधिकरी दुर्लक्ष करत असल्याचा संतप्त महिला पुरुषांचा आरोप
महावार्ता न्यूज : चाकूर, ता. २४ हणमंतजवळगा (ता.चाकूर) गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पाणी द्या या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता.२४) सकाळी अकरा वाजता पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला, आक्रमक झालेल्या जवळपास पाचशे महिला व पुरूषाचा जमाव कार्यालयाबाहेर पाणी द्या या मागणीच्या घोषणा देत होता.
हणमंतजवळगा गावाला हिंपळनेर येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. हिंपळनेर येथील काही व्यक्तींनी या पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीवरील मोटारी व पाईपलाईची नासधुस केली आहे. यामुळे पंधरा दिवसापासून गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे निवेदन देऊन सदरील व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली होती परंतू प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही तसेच पाणीपुरवठाही सुरळीत केला जात नाही.
पाण्याअभावी ग्रामस्थांना
भटकंती करावी लागत असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही समस्या तातडीने सोडवावी अन्यथा पंचायत समिती कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्या होता त्यानुसार शुक्रवारी सकाळी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात पाच ते सहा व्यक्तींनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिस व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या हातातील डिझेलच्या बाटली काढून घेतल्या. जवळपास पाचशे महिला व पुरूषांचा जमाव पंचायत समिती कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत
असताना पोलिसांनी त्यांना गेटवर अडविले.
गावातील पाणीपुरवठा तात्काळ सुरु करावा, पाणीपुरवठा योजनेवरील मोटारी व पाईपलाईनची नासधुस केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक कपील पाटील यांनी ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन
केले परंतू जमाव आक्रमक झाला होता. या आंदोलनात रामदास बालने, तुकाराम केंद्रे, विठ्ल उदगीरे, व्यंकट बेडदे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहीरीवर भेट दिली गावातील पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्यात येईल तसेच हिंपळनेर गावाला या विहीरीतून पाणी दिले जाणार नाही याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.