सरसकट आरक्षण द्या उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर – महावार्ता न्यूज
महावार्ता न्यूज सुशिल वाघमारे

चाकूर: महावार्ता न्यूज नेटवर्क
लिंगायताना सरसकट आरक्षण लागू करावे, यासाठी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगायत महासंघ चाकूर शाखेच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात एक कोटी लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाला २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ओबीसीचे आरक्षण जाहीर केले. महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला लिंगायत, हिंदू लिंगायत व वाणी नावाने ओळखले जाते. मात्र २०१४ साली वाणी, लिंगायत वाणी या नावाला आरक्षण दिले गेले. त्याचा फायदा समाजातील खुपच अल्प लोकांना झाला. मात्र लाखोंच्या संख्येने जातीची नोंद लिंगायत, हिंदू लिंगायत असणाऱ्या लिंगायत (वाणी) समाजाला या आरक्षणाचा कसलाच फायदा झाला नाही. महसुली पुरावे शोधून आरक्षण मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. पुरावे न मिळाल्याने याही ठिकाणी समाजाच्या पदरी निराशाच आली. त्यानंतर आमची मागणी पुढच्या सरकारकडे चालूच राहिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्याबरोबर मुंबईत बैठका झाल्या. त्यांना सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली. एक महिन्यात सरसकट लिंगायतांना आरक्षण देण्याचे फडणवीस सरकारने कबुल केले होते. मात्र पाच वर्ष होत आहेत आम्हाला अद्याप न्याय मिळाला नाही.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी वाणी नावाला जे ओबीसीचे आरक्षण लागू झाले आहे ते लिंगायत, हिंदू लिंगायत या नावाने नोंद असणाऱ्या सरसकट लिंगायतांना आरक्षण लागू होण्यासाठी शासनाने शुध्दीपत्रक काढावे. ज्यात वाणी, लिंगायत वाणी, हिंदू लिंगायत ही एकाच जातीची नावे आहेत असा उल्लेख असावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर लिंगायत महासंघ चाकुर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, कार्याध्यक्ष धीरज माकणे, शहराध्यक्ष संजय पाटील, दिपक पाटील, संदीप माकणे, संगमेश्वर कस्तुरे, परमेश्वर ढगे, सिद्धेश्वर पटणे, राजकुमार शेटे, माधव ढोबळे, सुधाकर पताळे आदीसह असंख्य लिंगायत समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.