चाकूर चा पाणी प्रश्न कायमचा मिटणार, घरणी प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होणार- नगराध्यक्ष
चाकूर शहरासाठी ७५.६५ कोटी रूपयाच्या पाणीपुरवठा योजनेला मंजूरी
चाकूर: (महावार्ता न्यूज)चाकूर शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ७५.६५ कोटी रूपयाच्या पाणीपुरवठा योजनाला मंजूरी मिळाली असून या योजनेमुळे शहरातील प्रत्येक कुटुंबाला २४ तास मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष कपील माकणे यांनी दिली आहे.
चाकूर शहराला बोथी तलावावरून पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत आहे, ही योजना कालबाह्य झाली असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नविन पाणीपुरवठा योजना मंजूर करणे गरजेचे होते. यासाठी नगराध्यक्ष कपील माकणे यांनी दोन वर्षाच्या कालावधीत योजनेचे सर्वेक्षण, पाणी आरक्षण, तांत्रीक मान्यता, प्रशासकीय मान्यता ही कामे तातडीने करून घेतली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीची प्रशासकीय मंजुरी संदर्भातील बैठक शुक्रवारी (ता.२३) मुंबई येथे पार पडली. या बैठकीत चाकूर शहरातील पाणीपुरवठा योजनेला राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे. प्रशासकीय मंजुरीचे आदेश लवकरच निर्गमित होणार आहेत.
घरणी प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होणार असून यासाठी ७५.६५ कोटी रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चु कडू, माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील, आ. बाबासाहेब पाटील यांनी सहकार्य केल्यामुळे ही योजना तातडीने मंजूर झाली असल्यामुळे नगराध्यक्ष कपील माकणे यांनी त्यांचे आभार मानले आहे.