
महावार्ता न्यूज लातूर, दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी शुक्रवारी लातूर शहरातील मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच महाराणा प्रतापनगर येथील स्थिर निगराणी पथकाला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला.
सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, तहसीलदार सौदागर तांदळे यावेळी उपस्थित होते.
लातूर शहरातील 22 मतदान केंद्रांची निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी भेट देवून तेथील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदान केंद्र इमारत, मतदान कक्ष आणि परिसराची पाहणी केली. तसेच अनुषंगिक सूचना केल्या.
महाराणा प्रतापनगर येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या स्थिर निगराणी पथकाचीही निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी पाहणी केली. याठिकाणी नियुक्त अधिकारी यांच्याकडून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच या पथकाने काळजीपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.