कोणता झेंडा घेऊ हाती? निष्ठावान कार्यकर्त्यात संभ्रमाची स्थिती!
मराठा ओबीसी आरक्षणाचे निवडणुकीत वारे.. बंडखोरीची पुनरावृत्ती

चाकूर (सुशील वाघमारे): चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये २०१९ ची निवडणूक सुरुवातीला चौरंगी अशीच वाटत होती मात्र झाली ती तिरंगीच. भाजपासोबत बंडखोरी करत दोन बंडखोरामुळे भाजपच्या उमेवारांचा पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराने मात्र विजयश्री खेचून आणला. यंदा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साठी अशीच स्थिती मतदार संघात उद्धवेल का असेच चित्र सध्यातरी दिसून येत आहे.
चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना संधी देण्याची परंपरा फार जुनी आहे वास्तविक पाहता हा भाजपाचा मतदारसंघ असताना ऐनवेळी अंतर्गत गटबाजीमुळे निवडणुकीत फेरबदल होताना आजपर्यंत दिसून आले आहे. 2014 विधानसभेच्या निवडणुकीचा विचार करत असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून बाबासाहेब पाटील भाजपाकडून गणेश हाके काँग्रेसकडून विठ्ठल राव माकणे बसपाकडून सय्यद साजिद तर अपक्ष म्हणून विनायकराव जाधव पाटील हे निवडणूक रिंगणामध्ये उभे होते. दोन लाख 90 हजार 360 मतदान होते यापैकी दोन लाख 41 हजार 47 प्रत्यक्ष मतदान झाले. यावेळी देखील अपक्ष उमेदवार विनायकराव जाधव पाटील राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील भाजपाचे गणेश हक्के यांच्यात चुरशीची तिरंगी लढत झाली. यावेळी मात्र जनतेने कौल अपक्ष उमेदवारालाच दिला आणि विनायकराव जाधव पाटील यांनी 46 मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणला. मोदीची लाट असतानाही भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत अपक्ष उमेदवाराने आपली ताकद दाखवली. तदनंतर विकासाच्या दृष्टीने पावले उचलत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून विकासात्मक कामे करण्याचा मनोदय बाळगत राजकीय प्रवास सुरू केला. मतदार संघाच्या दृष्टिकोनातून असंख्य कामे , निधी मतदार संघामध्ये खेचून आणण्याचे काम आ.विनायकराव पाटील यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केले. पाहता पाहता पाच वर्षे सरून गेले.
2019 ची विधानसभा आली. 2014 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असणारे विनायकराव जाधव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या निवडणुकीत मात्र भाजपने त्यांनाच उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी चे बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळाली. भाजपाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अशोकराव केंद्रे यांच्या पत्नी आयोध्या केंद्रे यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळवली तर भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाचे नेते दिलीपराव देशमुख यांनी बंडोकरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. 2019 ची निवडणूक ही प्रचंड चुरशीची झाली मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा चौरंगी होणार की काय असे स्थिती निर्माण झाली. ‘भाजपा-राष्ट्रवादी-अपक्ष-वंचित’ अशी लढत दिसून आली खरी मात्र अंतिम टप्प्यात वंचितच्या उमेदवाराची प्रचार यंत्रणा मंदावली. अपक्ष उमेदवार असणारे दिलीपराव देशमुख मात्र निकराने लढले यावेळी तीन लाख 21 हजार 329 मतदानापैकी दोन लाख 14 हजार 981 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी झाल्यानंतर भाजपाचे विनायकराव जाधव पाटील यांना 55145 बंडखोर अपक्ष उमेदवार दिलीपराव देशमुख यांना 45 हजार 846 तर वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार आयोध्या अशोकराव केंद्रे यांना 22141 मतदान पडले महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांना ८४६३६ मतदान प्राप्त झाले आणि विजयाची माळ बाबासाहेब पाटील यांच्या गळ्यात पडली. भारतीय जनता पार्टीच्या दोन उमेदवाराने भाजप विरुद्ध बंडोकरी करत निवडणूक लढल्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपच्याच उमेदवाराचा राष्ट्रवादी कडून पराभव झाला हे इतिहासात नोंद झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबासाहेब पाटील यांनी मात्र आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तदनंतर प्रचंड उलतापालथ झाली. कधी पहाटे तर कधी सायंकाळी शपथविधी घेतल्या जाऊ लागल्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होण्याच्या चढाओढ लागल्या. आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये एवढा बदल कधी पाहता आला नाही असा बदल मात्र राजकीय वर्तुळामध्ये घडून आला. भाजपा ,शिवसेना, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले.
एवढेच नाही तर शिवसेनेतही फोडाफोडीचे राजकारण करून एकनाथ शिंदे चा शिवसेनेचा गट निर्माण झाला. एकनाथ शिंदे ना मुख्यमंत्री करत. राष्ट्रवादीचे अजित पवार व भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पदसिद्ध झाले. गुवाहाटीतला काय झाडी काय डोंगर हे आपण सर्वजण जाणूनच आहोत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून येत अजित पवारांच्या गोठा मध्ये जाणारे लातूर जिल्ह्यातील उदगीरचे आ. संजय बनसोडे व अहमदपूरचे बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सामील झाले. याचा लाभ मात्र उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना मंत्रिपदाच्या रूपाने झाला. वास्तविक पाहता सत्ते सोबत जाणारे हे दोन्ही आमदार आपल्या तालुक्यामध्ये विकास निधी खेचून आणण्यामध्ये यशस्वी ठरले. उदगीर तालुक्यात संजय बनसोडे यांनी 5000 कोटींची कामे केल्याचा दावा केला जात आहे. किंबहुना त्यांनी कायापालटच केला आहे. आज उदगीरला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ही मागणी जोर धरताना दिसून येत आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अडीच हजार कोटींची कामे केली असल्याचा दावाही विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.
सध्या 2024 ची निवडणूक होऊ घातली आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याचे आपण पाहिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी दोन पक्षांची फाळणी होऊन गट निर्माण झाली आहेत. यातच राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (उबाठा) हे गट महाविकास आघाडी सोबत शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीसोबत सामील झाले आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यामध्ये मात्र या गटात गटामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सेक्युलर म्हणून ओळखला जाणारा पक्ष असला तरी कोणत्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घ्यावा हे मात्र कार्यकर्त्यांना न उमजणारे कोडे आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष मानला जातो. हिंदुत्ववादी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या बाजूने उभे राहावे हाही कार्यकर्त्यात प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सुटल्यामुळे आमदार बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विनायकराव जाधव पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी मात्र बंडखोरी करत जनसुराज्य पक्षाकडून महायुती विरोधात उमेदवारी दाखल केली आहे आणि निवडणुकीच्या आखाड्यात सज्ज आहेत. तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघांमध्ये मात्र मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये झालेली आंदोलने यामुळे विभागलेली कार्यकर्ते मात्र वेगळी भूमिका घेत आहेत.
मराठा ओबीसी आरक्षणाचा कोणाला फायदा तर कोणाला तोटा होईल हे मात्र न उलगडणारे कोडेच आहे. दोन्ही पक्षाकडून मराठा समाजातील उमेदवार असल्यामुळे ओबीसीचा उमेदवार निवडून जाईल का? असा ही तर्क लावला जात आहे. मतदार संघामध्ये 10 पक्षाचे तर 10 अपक्ष एकूण वीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 45 हजार मतदार आहेत. यापैकी किती मतदान होईल यावर आता राजकीय गणित ठरणार आहेत. काही अपक्ष उमेदवारांनी देखील जोरदार तयारी दर्शवली आहे. 2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 22141 मते प्राप्त केले होते. यंदा मात्र वंचित चा उमेदवारच नसल्याने वंचित चे कार्यकर्ते मात्र कोणाच्या बाजूने जावे या विवंचनेत आहेत. पक्षाचा जो निर्णय तोच अंतिम निर्णय म्हणून पक्षाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. भाजपातील निष्ठावान कार्यकर्ते , वंचित चे कार्यकर्ते यांची मात्र गत कोणता झेंडा घेऊ हाती अशीच झाली आहे. जनतेत मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि जनसुराज्य पार्टी या तिघातच तिरंगी लढत रंगणार असल्याची चर्चा मात्र जोर धरताना दिसून येत आहे.
माजी मंत्री विनायकराव जाधव पाटील यांना माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या विकासाभिमुख कार्यामुळे तसेच 2014 ते 2019 या काळात केलेल्या कार्यामुळे जनता पुन्हा एकदा निवडून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विद्यमान आ बाबासाहेब पाटील यांनी भाजप प्रणित महायुतीसोबत जाऊन कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली असल्याचा विश्वास आहे. मतदार संघातील एक लाख वीस हजार लाडक्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. या लाडक्या बहिणी महायुती सोबत राहतील असा विश्वास आहे.
-
भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा बंडखोरी करत जनसुराज्य पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांना माजी आ. बब्रुवान खंदाडे यांच्या साथीने ओबीसी मते मिळतील अशी अपेक्षा आहे. वस्तुस्थिती पाहता दलीत-मुस्लिम मतदारावर अहमदपूर विधानसभेची मदार आहे. येणाऱ्या 23 तारखेलाच समजेल कोण बाजी मरणार? आजी माजी का दादाजी…